Tuesday, September 22, 2020

7/12 उतारा म्हणजे काय? कसा पाहावा?

आपण जर शेतकरी असाल तर 7/12 उताऱ्याची गरज आपल्याला नेहमीच पडत असेल. त्याचबरोबर कुठलीही शेतजमीन घ्यायची असल्यास आपण सगळ्यात आधी 7/12 उतारा पाहात असतो जेणेकरून आपल्याला संबंधित जमिनीची पूर्ण माहिती मिळते तसेच त्या जमिनीसंबंधी असलेल्या विविध कायदेशीर बाबी जसे की कर्ज, वारसदार यांचीही माहिती मिळते. 

बऱ्याच जणांना 7/12 Extract मध्ये कुठल्या बाबी उल्लेखलेल्या असतात तसेच त्या कुठे नमूद केलेल्या असतात हे माहित नसते. 

आज आपण अश्याच काही बाबींबद्दल जाणून घेणार आहोत. यात तुम्हाला पडलेल्या पुढील प्रश्नांचा समावेश आहे. 

  1. 7/12 उतारा म्हणजे काय (What is 7/12 Extract)?
  2. 7/12 उतारा कसा पाहावा/डाउनलोड करावा  (How to Read 7/12 वर Download 7/12 Extract)?
  3. 7/उतारा कसा वाचावा (How to Read 7/12 Extract)?
  4. 8 अ उतारा म्हणजे काय आणि तो कसा डाउनलोड करावा(What is 8A and How to Download it)?

7/12 उतारा म्हणजे काय (What is 7/12 Extract)?

थोडक्यात सांगायचे तर 7/12 उतारा म्हणजे तुमच्या शेत जमिनीची सरकार दरबारी नोंद असल्याचा पुरावा होय. यात संबंधित जमिनीच्या तुकड्याचे क्षेत्रफळ, मालकाचे नाव, वारसदार तसेच जमिनीच्या प्रकाराबरोबरच त्या जमिनीत घेतली जाणारी पिके यांची माहिती नमूद केलेली असते. 

7/12 उतारा कसा पाहावा/डाउनलोड करावा (How to Read 7/12 or Download 7/12 Extract)?

7/12 उतारा कसा पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी आपण पुढील पद्धत वापरू शकता.

सर्वप्रथम इथे क्लिक करून महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या संकेतस्थळावर जा. 

हे संकेतस्थळ तुम्हाला अश्या प्रकारे दिसेल. 

यात आपला विभाग निवडा यानंतर आपला जिल्हा तालुका आणि आपले गाव निवडा. 

पुढे दिलेल्या पर्यायांपैकी आपल्याला योग्य पर्याय निवडा. शक्य असल्यास सर्व्हे क्रमांक किंवा गट क्रमांक हा पर्याय निवडा आणि तो प्रविष्ट करा. तो नसल्यास आपण आपले नाव, मधले नाव किंवा आडनाव प्रविष्ट करू शकता पुढे शोधा या बटनावर क्लिक करा.

आपण प्रविष्ट केलेल्या माहितीशी मिळते जुळते सर्व्हे क्रमांक असलेल्या 7/12 उताऱ्यांची यादी आपल्याला दिसेल. यातील आपल्याला हवा असलेला उतारा निवडा. पुढे आपला मोबाईल क्रमांक देऊन 7/12 पहा या बटनावर क्लिक करा.

तुम्हाला समोर दिसणारा सातबारा उतारा डाउनलोड करायचा असल्यास तुम्ही प्रिंट कमांड वापरून सेव्ह ऍज पीडीएफ(Save As PDF) हा पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला हव्या त्या फोल्डरमध्ये आपण हि फाईल सेव्ह करा.

7/12 उतारा कसा वाचावा

7/12 उतारा कसा वाचावा (How to Read 7/12 Extract)?

खालील चित्रामध्ये उतारा 7 दर्शविलेला आहे. यात लाल रंगाच्या चौकटीत दर्शवलेल्या भागात संबंधित भूखंडाची भौगोलिक माहिती दर्शवलेली असते. यावरून आपल्याला तो भूखंड कुठे आहे हे कळू शकेल. 

हिरव्या रंगाच्या चौकटीत संबंधित भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ तसेच त्यापैकी किती क्षेत्रफळ कोणत्या जमिनीच्या    प्रकारात मोडते याची माहिती मिळते.

निळ्या रंगाने दर्शवलेल्या चौकटीत संबंधित जागेच्या मालकांची/भोगवटाधारकांची आणि वारसदारांची नावे असतात. यात त्या त्या व्यक्तीच्या मालकीच्या हिस्स्याची माहिती दिलेली असते.

पिवळ्या रंगात दर्शविलेल्या चौकटीत खाते क्रमांक, कुळ असल्यास त्यांचे नाव आणि इतर अधिकार असलेल्या व्यक्ती/संस्थांचे नाव असते. 

उदा. वनजमीन असल्यास त्या जमिनीवर वहिवाट असलेल्या व्यक्तींची नावे तसेच कर्ज देणाऱ्या पतसंस्थांची नावे आणि त्या कर्जाची रक्कम.

यातील उतारा क्रमांक 12 मध्ये आपण सदर भूखंडात घेतल्या जाणाऱ्या पिकांबद्दल माहिती मिळवू शकतो. यात मागील तीन वर्षात घेतलेल्या रब्बी तसेच खरीप हंगामातील पिकांची माहिती नमूद केलेली मिळेल. 

‘8 अ’ उतारा म्हणजे काय आणि तो कसा डाउनलोड करावा(What is 8A Extract and How to Download it)?

8 अ उताऱ्यामध्ये आपल्या नवे असलेल्या खाते क्रमांकातील सर्व सातबाऱ्यांची थोडक्यात माहिती दिलेली असते जसे की त्या खाते क्रमांकात असलेले इतर खातेधारक, त्या खाते क्रमांकात नोंद असलेले इतर 7/12 उतारे आणि त्यांचे क्षेत्रफळ.

8 अ उतारा डाउनलोड करण्याची प्रक्रिया ही 7/12 उतारा डाउनलोड करण्याच्या प्रक्रियेसारखीच असून फक्त त्यात सर्व्हे क्रमांक/गट क्रमांक ऐवजी खाते क्रमांक द्यावा लागतो.

The post 7/12 उतारा म्हणजे काय? कसा पाहावा? first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3i0LjZL
via IFTTT

No comments:

Post a Comment